गुजरात राज्यात IPSची नोकरी सोडून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या मनोज निनामा यांचा पराभव झाला आहे. राज्यात भाजपची प्रचंड मोठी लाट असतानाही ते पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार राहिलेल्या भूपत भयाली यांनाही जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी IPS मनोज निनामा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. निनामा गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी होते. राजकारणात येण्यासाठी त्यांनी आयपीएसची नोकरी सोडली. यानंतर भाजपनं त्यांना अरावलीतील शामलाजी तालुक्यातील ओध जिल्हा पंचायतीमधून तिकीट दिलं होतं.
गुजरात केडरचे माजी IPS मनोज निनाम यांनी ४२ वर्षे पोलीस दलात सेवा दिली. त्यांनी भाजपकडून अरावली जिल्हा पंचायतीच्या शामलाजी तालुक्याच्या ओध जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवली. मनोज निनामा ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. पण आपल्या गावातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. सत्ताधारी पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली. राज्यात भाजपची लाट असूनही त्यांचा पराभव झाला.


