पार्सल देण्यास नकार दिल्याचा राग; व्यावसायिक भावांवर टोळक्याचा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर, – पार्सल मागविल्यानंतर ते दुकानापर्यंत आणून देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून पावभाजी व बिर्याणी विक्रेत्या दोन भावांना चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (14 जून) सायंकाळी अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील उच्छल कॉम्प्लेक्ससमोर घडली. या हल्ल्यात अनिस शेख (रा. बुरूडगाव रस्ता) हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पार्सल न दिल्याने वाद
दुसरा जखमी अलीम जाफर शेख (वय 40, रा. बुरूडगाव रस्ता) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चार ते पाच अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अलीम शेख यांचा उच्छल कॉम्प्लेक्ससमोर अल्पना पावभाजी तर त्यांचे भाऊ अनिस शेख यांचा शाही बिर्याणी नावाचा हातगाडी व्यवसाय आहे.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोघेही नेहमीप्रमाणे व्यवसाय करत असताना उच्छल कॉम्प्लेक्समधील एका खासगी आस्थापनात काम करणारा तोंडओळखीचा व्यक्ती त्यांच्या गाडीवर आला. त्याने कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस पुलावचे पार्सल आणून देण्याची मागणी केली. व्यवसाय सुरू असल्याने दुकान सोडून पार्सल देण्यासाठी जाणे शक्य नसल्याचे सांगत अलीम शेख यांनी त्यास नकार दिला.
धमकी देऊन मारहाण
याचा राग मनात धरून संबंधित व्यक्ती काही वेळाने आणखी तीन ते चार जणांना घेऊन हातगाडीवर परत आला. यावेळी ‘तुम्ही आम्हाला पार्सल का दिले नाही, तुम्हाला येथे धंदा करू देत नाही’, अशी धमकी देत टोळक्याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली. दोन्ही भावांनी शांततेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या आरोपींनी अलीम शेख व अनिस शेख यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


