अहिल्यानगर-लग्नास विरोध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती-पत्नीला लाकडी दांडके आणि गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वडगाव तांदळी (ता. अहिल्यानगर) परिसरात घडली. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ऋतुजा भिमराज धाडगे (वय 22, रा. वडगाव तांदळी, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा भाऊ ऋषिकेश लक्ष्मण कळमकर (रा. गांधीनगर, बोल्हेगाव), विशाल गोल्हार, ओंकार सांगळे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. बोल्हेगाव), आकाश केदार (पूर्ण नाव माहिती नाही, रा. निंबळक, ता. अहिल्यानगर) तसेच इतर अनोळखी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व ऋषीकेश हे नात्याने भाऊ-बहिण असून, फिर्यादीच्या लग्नास ऋषीकेशचा विरोध होता. त्यातून संशयित आरोपींनी मनात राग धरून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे पती व साक्षीदारांना लाकडी दांडके व लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार माने करीत आहेत.


