अन्न व औषध प्रशासनाने राज्यात ‘सुरक्षित अन्न, ‘निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. तर जे कोणी नियमांचं उल्लंघन करतील अशा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे मालकांना सोडणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय. हॉटेलवाल्यांना इशारा देतानाच तुकाराम मुंढेंनी हॉटेलसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. एफडीएने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेल्सचे किचन नसेल.त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे आरोग्य विषयी नियमांचं पालन करताना काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमांचं सर्वांनी पालन करणं बंधनकारक असेल. जर नियमांचं पालन केलं तर घाबरण्याचं कारण नाही. पण नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा कडक इशारा मुंढे यांनी दिला आहे. एफडीएच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते, त्यांचे किचन म्हणजे स्वयंपाक घर कसं असावं, त्या संबंधित नियम काय आहेत याची माहितीही त्यांनी आज दिली आहे.
भिंती आणि फ्लोअर या टाईल्सच्या असाव्यात. त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात. त्यातून पाणी झिरपू नये.
किचनमध्ये पुरेशी हवा खेळती हवी. तसेच किचनला एक्झॉस्ट असावा.
कच्चा मालासाठी वेगळा सेक्शन असावे.
स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन असावे. यात कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.
किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवले पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.
किचनमध्ये पेस्ट कंट्रोल नियमित केले पाहिजे. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा. यासह ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत.
अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवतात. आता अशा हॉटेल चालकांना तुकाराम मुंढें लगाम घातलाय. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिलेत.


