पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्रदिनाच्या दिवशी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापजनक पडसाद उमटले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज (गुरुवारी दि. २५ जून) लागला आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली. आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आहेत. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे. भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखामा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या. समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल हे देखील न्यायालयात आलेत. सरकारी वकिलांकडून अशाच गंभीर गुह्याच्या खटल्यांचा आणि त्यामधे सुनावण्यात आलेल्या खटल्यांचा संदर्भ देण्यात येत आहेत. आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हलण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरुन कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना चारवेळा विचार करेल, अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली आहे.
दरम्यान. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, ‘तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?’, असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती”, असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की ” आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी ” . न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.


