सुसरे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार; ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे निलंबित
पाथर्डी – तालुक्यातील सुसरे ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमितता, निधीचा अपहार आणि विविध योजनांमध्ये गैरप्रकार आढळल्याने ग्रामपंचायत अधिकारी गणेश बाबासाहेब ढाकणे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवारी (दि. २७) ही कारवाई केली.
पंचायत समिती पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात हा गैरप्रकार उघड झाला आहे. अहवालानुसार कायमस्वरूपी निधीचा अपहार, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेतील निविदा व कामांतील अनियमितता, चिंचफळ लिलाव, कर वसुलीमध्ये अनियमितता आणि मंजूर आदेशाशिवाय अंगणवाडीचे निलेखन केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर योजनांमध्येही आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद आहे.
ढाकणे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमांचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने शिस्त व अपील नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पाठपुराव्याला यश –
या कारवाईमुळे ग्रामस्थ सुरेश उदागे यांच्या दहा महिन्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. केवळ निलंबन न करता सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि अपहाराची रक्कम वसूल करून सुसरेच्या विकासासाठी खर्च करावी, अशी मागणी उदागे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.


