पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणाचे अनेक धागेदोरे समोर येत आहेत. तपास यंत्रणांकडून अत्यंत वेगाने या हत्येप्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, ही हत्या म्हणजे पूर्वनियोजित कट होता, असंही तपासातून समोर येत आहे. ६ जून रोजी प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्यासाठी निघालेलं हे जोडपं पासपोर्ट हरवलं म्हणून माघारी परतलं. आता याचबाबतचा मोठा खुलासा समोर आला आहे. आज तकने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
वैभव जाधव या टॅक्सी चालकाने सिया, केतन आणि इतर दोघांना पुण्याहून मुंबई विमानतळापर्यंत नेले होते. या प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं, याविषयी माहिती घेण्यासाठी आज तकने वैभव जाधव यांच्याशी संवाद साधला. जाधव यांनी सकाळी १० वाजता पुणे येथून प्रवाशांना गाडीत बसवलं. सुरुवातीला सियाने टॅक्सीत बसण्यास नकार दिला होता, मात्र तिचा भाऊ साहिलने तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं. त्यानंतर रावेत येथे केतन अग्रवाल गाडीत आला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून जात असताना सियाने चहासाठी गाडी एका फूड मॉलजवळ थांबवण्यास सांगितली. सुमारे १० मिनिटांनंतर ती गाडीजवळ परतली आणि तिने चालकाला डिक्की उघडण्यास सांगितलं. डिक्कीच्या भागातून तिने तिच्या पर्समधून काहीतरी बाहेर काढलं, मात्र ती वस्तू काय होती हे चालकाला समजलं नाही. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी प्रवास पुन्हा सुरू झाला.
चालकाने सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर सोडलं. तिथून अवघ्या २०० मीटर अंतरावर गेल्यावर चालकाला फोन आला की एक लहान बॅग गाडीत राहिली आहे, जी चालकाने परत केली. त्यानंतर आणखी ५०० मीटर पुढे गेल्यावर केतनचा पासपोर्ट गाडीत पडल्याचा दुसरा फोन आला. चालकाने गाडी तपासली असता पासपोर्ट सापडला नाही. प्रवाशांच्या सांगण्यावरून त्याने व्हिडिओ कॉलद्वारे गाडीची आतील बाजू दाखवली, तरीही पासपोर्ट दिसला नाही. शेवटी चालकाला पुन्हा विमानतळावर बोलावण्यात आले. तिथे साहिल आणि केतनने स्वतः गाडीची झडती घेतली; मात्र पासपोर्ट सापडला नाही. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा केवळ पासपोर्ट चोरीचा प्रकार नसून केतन अगरवालच्या हत्येसाठी रचलेल्या एका मोठ्या कटाचा (मर्डर कॉन्स्पिरसी) भाग आहे.


