संगमनेर-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारा तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या व्हिडिओने राज्यभर मोठी खळबळ उडाली असून भंडारे यांनी व्हिडिओद्वारे ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ अशी थेट धमकी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेस, विजय वडेट्टीवर आदी नेत्यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे. संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना राजकीय पक्षांची बाजू घेऊन बोलताना गावकर्यांनी अभंग सोडवण्याची विनंती केली. यावर धार्मिक संघटनांनी राजकारण करून गोंधळ निर्माण केला.
समाज माध्यमांवर व इतर ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शांतता राखा असे सांगतानाच करून धर्मपिठाचे पावित्र्य राखावे असे आवाहन केले. कीर्तनकार व समाजप्रबोधकांनी थोर संतांची परंपरा जपताना मानवतेचा धर्म पुढे न्यावा असे स्पष्ट केले. याचबरोबर संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपावी अशी विनंती केली.
यानंतर रात्री तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिल्याने राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेने संगमनेरमधील गावागावांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक गावांमधून आता आज संगमनेरकडे कूच होणार आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली असून पुरोगामी संघटना, हिंदुधर्मीय व वारकरी संप्रदायाने सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
घुलेवाडी सप्ताहात जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे. संगमनेर तालुका शांतता आणि बंधुतेचे वातावरण असणारा सुजलम सुफलाम तालुका आहे. मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून तालुक्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याचबरोबर अशा अशांतता निर्माण करणार्या शक्तींना वेळीच रोखून तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.याबाबत ते पुढे म्हणाले, संगमनेर तालुका हा शांततेचा, बंधुभावाचे वातावरण असणारा तालुका आहे. विकासाची सातत्याने वाटचाल करणारा हा तालुका आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्यासाठीचे ते व्यासपीठ आहे. आपल्या संतांचे विचार त्या व्यासपीठावरून मांडले गेले पाहिजे. त्या व्यासपीठाला काही मर्यादा आहेत. काही नियम आहेत. ते सर्वांनी पाळले पाहिजे. हे पथ्य किंवा नियम असे आहे की, या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. कारण याठिकाणी सर्व लोक एकत्र येतात, बंधुभावाचे वातावरण त्याठिकाणी असते.


