राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, योजनेतील तब्बल ९१ लाख लाभार्थी महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवल्यानंतर सरकारकडून लाभार्थींची माहिती पुन्हा तपासण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांच्या पात्रतेचीही पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.या संदर्भात महिला आणि बाल विकास विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची कागदपत्रे, पात्रतेचे निकष आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पुन्हा तपासणी होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा किंवा सविस्तर माहिती समोर येणे अद्याप बाकी आहे.
दरम्यान, राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याच्या वितरणाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा निधी थेट लाभ हस्तांतरण अर्थात च्या माध्यमातून जमा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना ही विशेष भेट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, एकीकडे हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार असल्याची माहिती समोर आल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे.


