अहिल्यानगर, विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असून 17 पैकी 15 जागांवर एकमत झाले आहे. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक 8 जागा लढविणार आहे. शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा लढविणार आहे. या वाटपात अहिल्यानगरची जागा काँग्रेसकडे गेली आहे.
करण ससाणे रिंगणात
श्रीरामपूरमधील दिवंगत नेते जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज नेला असून त्यांनी पहिला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. काँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. करण ससाणे यांनी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे वडील जयंत ससाणे यांनी पूर्वी ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक लढविली होती. त्यावेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले अरुणकाका जगताप यांनी ससाणे यांचा धक्कादायक पराभव केला होता. आता ससाणे यांचे चिरंजीव या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत.
महायुतीकडून तनपुरे, जगताप इच्छुक
महायुतीकडून ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यासाठी पक्षांतर करून येणार असलेले प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे अरुणकाका जगताप यांचे चिरंजीव सचिन जगताप हेही इच्छुक असून त्यांनीही यापूर्वीच उमेदवारी अर्ज घेतला आहे.
पवार गटाने सोडला दावा
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांच्या पक्षाला पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन जागा जाणार आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगर जिल्ह्यावरील दावा सोडला ही लक्षवेधी घटना आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळीही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सोडला नव्हता. आताच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे 35 तर राष्ट्रवादीचे 29 मतदार आहेत.


