सोशल मीडियाचा वापर वाढला आणि आभासी जगात लोकं जास्तच रमायला लागले. सोशल मीडियावरचे रीलस्टार जे दाखवतात, जे आयुष्य जगतात, ते त्यांच खरं आयुष्य आहे असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं असेलचं नाही. कॅमेऱ्यासमोर हसतमुखाने वावरणारी माणसं नेहमी खुशच असतात असं नाही, त्यांच्या हास्यामागे काहीतरी दडलेलं असू शकतं. इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स, शेकडो रील्स, मजेशीर व्हिडीओ , गावरान भाषेचा ठसका, ते बोलत लोकांचं मनोरंजन करणारी रीलस्टार म्हणून रोहिणी पाराध्ये आणि तिचा पती निलेश हे दोघे प्रसिद्ध होते.सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गावात त्यांचं हॉटेल खूप गाजत होतं, पण तेच हॉटेल आता वेगळ्या कारणांनी चर्चेत आलं. त्याच हॉटेलमध्ये तिने आयुष्याचा शेवट केला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून तिचे फॉलोअर्सही हळहळ व्यक्त करत आहेत.
रोहिणी आणि निलेश पाराध्ये यांच्या अकाऊंटवर जवळपास 875 पोस्ट असून 3 लाखांपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत. अथक मेहनतीने चाललेलं त्यांचं हॉटेल ग्रामपंचायत यशस्वीपणे सुरू होतं, धंदा चांगला सुरू होता. ते दोघे चांगलेच लोकप्रिय होते, त्यांचा व्यवसायही वाढत होता. वरून सगळं एवढं चांगलं दिसत असताना, अवघ्या 25 वर्षांच्या रोहिणीच्या आयुष्यात असं काय घडलं की, तिने सगळं सोडून देत, मागचा पुढचा जराही विचार न करता स्वत:ला गळफास लावून घेत आयुष्य संपवलं? असा प्रश्न तिचे घरचे, कुटुंबीय आणिलाखो लोकांच्या , फॉलोअर्सच्या मनातही आहे.
दरम्यान रोहिणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली असून तिच्या या कृतीमागचं कारण शोधण्यात पोलिस व्यस्त आहेत. पोलिसांनी रोहिणी-निलेशच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये काही घडलं होतं का हे पडताळून पाहिलं जाणार आहे. तसेच रोहिणीचा मोबाईल, तिचे कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.
आत्महत्येपूर्वी रोहिणीने कोणाशी संपर्क केला होता, तिचं कोणाशी बोलणं झालं होतं का, तिला कसला मानसिक तणाव होता का, आत्महत्येसारखं एवढं मोठं टोकाचं पाऊल तिने का उचललं? या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
तिचा नवरा, नातेवाईक, हॉटेलमध्ये काम करणारी माणसं, तिच्या मैत्रिणी, अशा सर्वांना प्रश्न विचारण्यात येणार असून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येतील. त्यातून काही धागेदोर मिळतात का हेही पोलिस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.


