चांदबिबी महालावर बिबट्याचा थरार! शुक्रवारी रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद
अंगावर शहारे आणणारे दर्शन; चांदबिबी महाल परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
नगर – नगर शहराजवळील ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात 21 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास बिबट्या वावरताना आढळून आला.
‘आनंद भुवन’चे संचालक आकाश वाळके हे महालावर गेले असता त्यांच्यासमोर अचानक बिबट्या आला. वाळके यांनी अत्यंत धाडसाने या थराराचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
परिसरातील वाढत्या धोक्यावर चिंता व्यक्त केली आहे. बिबट्याचे चमकणारे हिंस्र डोळे आणि आक्रमक हालचाल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वनविभागाची दिसाळ वृत्ती नागरिकांच्या जीवावर उठली असून, मोठी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
चांदबिबी महाल परिसरात दिवसभर पर्यटकांची वर्दळ असते, दररोज मोठ्या संख्येने शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. याशिवाय शहरातील अनेक नागरिक पहाटे व सायंकाळी या परिसरात व्यायामासाठी, वॉकिंगसाठी जात असतात. या परिसरात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे.
पर्यटकांच्या आणि वॉकिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.


