उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली
पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. मात्र, दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर 10 जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींंशी बातचीत करुन या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला. यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यानंतर ऑपरेशन टायगरला खऱ्या अर्थाने वेग आला होता.
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील


