अमेरिका-इराण युद्धाचा भारतीयांना फटका; घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर महागले

आठ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता सामान्य भारतीय नागरिकांना बसताना दिसत आहे. आखाती देशांत सुरू असलेल्या संघर्षामुळे संपुर्ण जगभरात ऊर्जा संकट ओढवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. भारतातही पडसाद उमटले असून आता संपूर्ण भारतात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर सुमारे ११५ रुपयांनी महागले आहे. आजपासूनच (७ मार्च) हा बदल लागू करण्यात आला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाली आहे. दिल्ली व्यतिरिक्त इतर प्रमुख शहरांमध्येही अशीच वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत सिलिंडरचा दर ९१२.५० रुपये झाला आहे. तर कोलकातामध्ये आता सिलिंडरचा दर ९३९ वर पोहोचला आहे. चेन्नईमधील सुधारित दरानुसार सिलिंडरची किंमत ९२८.५० रुपये झाली आहे.
जगाला तेल आणि गॅसचा पुरवठा करणाऱ्या साखळीमध्ये महत्वाचा असलेल्या पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यामुळे जगावर ऊर्जा संकट ओढवले आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वयंपाकाच्या गॅसच्य दरात वाढ झाली असली तरी हे शेजारील देशांपेक्षा कमी आहे, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वर्षभरात घरगुती एलपीजीच्या किंमतीमध्ये ही दुसरी मोठी वाढ आहे. याआधी एप्रिल २०२५ मध्ये ५० रुपयांनी गॅसचे दर वाढविण्यात आले होते.
घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरात वाढ होण्याबरोबरच रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ११५ रुपयांनी वाढून ती १,८८३ रुपये झाली आहे. तर मुंबईत आता त्याची किंमत १,८३५ रुपये झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles