महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित कथित अश्लील व्हिडीओची विक्री व प्रसार करणारे 74 टेलिग्राम गट आणि सोशल मीडिया खाती शोधून काढली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो हटविण्यात आले आहेत.
अशोक खरातचे केबिनमधील व्हिडीओ काही ग्रुपद्वारे अवघ्या 20 रुपयांना विकले जात असल्याची धक्कादायक माहितीही पोलीस तपासातून उघड झाली आहे. सायबर पोलिसांनी 11 सोशल मीडिया मध्यस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यातील 25 खात्यांकडून प्रतिसाद प्राप्त झाला आहे. एका संशयिताची ओळख पटली असून त्याची पडताळणी सुरू आहे
विशेष म्हणजे सायबर पोलिसांच्या तपासात या व्हिडीओचा प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून यूएई, श्रीलंका, फिलिपाईन्स, नायजेरिया तसेच भारतातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ डाउनलोड, खरेदी किंवा फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले असून संबंधित लिंक किंवा ग्रुप आढळल्यास तात्काळ तक्रार करण्यास सांगितले आहे.अशोक खरात स्वतःला सिद्धपुरुष किंवा अंकशास्त्रज्ञ ( म्हणून मिरवणारे भोंदूबाबा आहेत. अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांखाली त्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा तपास ‘एसआयटी’ करत आहे. खरात हा महिलांना दैवी शक्तीची भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन आणि पेढा-पाण्यातून अंमली पदार्थ देऊन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. त्याच्या कार्यालयाची आणि फार्म हाऊसची झडती घेतली असता, महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. अशोक खरात त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि ‘महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत 5 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


