राज्यपालाच्या निवासस्थानी गोळीबाराचा थरार, SRPF जवानाने गोळी झाडून आयुष्य संपवलं

मलबार हिल परिसरात असलेल्या व्हीआयपी आणि अतिसुरक्षित अशा राजभवन परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. राजभवनातील एसआरपीएफ कॅम्पमध्ये ही घटना घडली असून यामुळे मुंबई पोलीस आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या जवानाने राजभवनात ड्युटीवर असताना स्वतःच्याच सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या जवानाने असं कृत्य का केली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.आत्महत्या करणाऱ्या एसआरपीएफ जवानाचं नाव कौस्तुभ सांगळे असं असून ते पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. कौस्तुभ सांगळे हे एसआरपीएफ ग्रुप 16, कोल्हापूर येथील तुकडीचे जवान होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती.

आज ते राजभवन परिसरातील ‘लोक भवन’ येथे गार्ड ड्युटीवरतैनात होते. ड्युटी सुरू असतानाच अचानक त्यांनी स्वतःच्या रायफलमधून गोळी झाडली. गोळीबाराचा प्रचंड आवाज झाल्यानंतर परिसरातील इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सांगळे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच राजभवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा राजभवनात दाखल झाला आहे. पोलिसांनी जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कौस्तुभ सांगळे यांनी कौटुंबिक वादातून किंवा मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले का? याबाबत पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट अद्याप जप्त करण्यात आलेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजभवनातील इतर कर्मचाऱ्यांचे आणि जवानांचे जबाब नोंदवत असून या प्रकरणाचा पुढील तपास मलबार हिल पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles