Friday, November 14, 2025

धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक भंडारदरा, निळवंडेतून मोठा विसर्ग; प्रवरा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून, भंडारदरा, निळवंडेचे पाणी जायकवाडीकडे निघाले आहे. निळवंडेच्या विसर्गामुळे प्रवराकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरूच असून, ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक होत आहे. भंडारदऱ्यातून काल, रविवारपासून ८ हजार ७४० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

वाकी तलावाच्या सांडव्यावरून १५७३ क्युसेक पाणी कृष्णवंती नदीत पडत असून, कृष्णवंती दुथडी भरून वाहत आहे. भंडारदरा ते रंधा धबधब्यापर्यंतचे प्रवरा नदीला येऊन मिळणारे लहान-मोठे ओढेही दुथडी भरून वाहत आहेत. हे सर्व पाणी रंधा धबधब्याजवळ निळवंडे धरणात जमा होते. २४ तासांत निळवंडे धरणात सुमारे एक टीएमसी पाण्याची भर पडली. निळवंडेचा साठा ६ हजार ७०६ दलघफू (८०.५२ टक्के) झाला. धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी निळवंडेमधून १३ हजार २०३ क्युसेक एवढे पाणी सोडले जात आहे. रात्री त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. भंडारदरा विसर्गही वाढवून ९ हजार ७७४ करण्यात आला.

भंडारदरा, निळवंडेचे पाणी आता जायकवाडीत पोहचेल. निळवंडेतून सोडलेल्या पाण्यामुळे प्रवरा नदीवरील अकोले येथील अगस्ती सेतू या पुलावर पाणी आल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

प्रवरा नदीला मिळणाऱ्या आढळा व म्हाळुंगी नद्यांनाही चांगले पाणी आले. प्रवरा नदीच्या पाणीपातळीत संगमनेरच्या पुढे अजून वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहता, राहुरी, श्रीरामपूर, आणि नेवासे तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.भंडारदरा पाणलोटातील रतनवाडीला १८१ मिमी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे भंडारदरा जलविद्युत क्रमांक २ (कोदनि प्रकल्प) बंद झाला आहे.

प्रवरा नदीमधून फार मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे हे पाणी रंधा धबधब्याजवळ दोन्ही काठांवर पसरले आहे. या पाण्यात धबधबा जणू गायब झाला आहे.मुळा पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच असून, कोतुळजवळ सकाळी मुळा नदीचा विसर्ग १० हजार ३४२ क्युसेक होता. मुळा धरण ६४ टक्के भरले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles