पुन्हा एकदा कसोटी चांगले दिवस आले आहेत. कसोटी क्रिकेट पाहण्याची रंगत नव्या नियमामुळे वाढली आहे. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. असं असताना क्रिकेट नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने कसोटी क्रिकेटच्या नियमात काही बदल केले आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेट सामने आणखी रोमांचक होणार आहेत.
मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम 12.5.2 च्या मते, कसोटी क्रिकेटच्या शेवटच्या दिवशी विकेट पडली की आता खेळ बंद होणार नाही. यापूर्वी विकेट जर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पडली तर सामना तिथेच थांबवला जायचा. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा व्हायचा. दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या रणनितीनुसार फलंदाज फलंदाजीला उतरत होता. पण आता तसं होणार नाही. एसीसीच्या नियमानुसार, शेवटच्या षटकात विकेट पडली तरी त्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेळला जाईल. यामुळे क्षेत्ररक्षण करणारा संघ सामन्यावर पकड मजबूत करण्यास सक्षम राहील. तसेच प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्यास मदत होईल.
नव्या नियमानुसार, महिला क्रिकेट आणि ज्यूनिअर क्रिकेट (अंडर 13) मध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूत बदल होणार आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूचं वजन हे 140 ते 151 ग्रॅम दरम्यान होतं. तर त्याचा आकार 21 ते 22.6 सेमी होता. पण आता नव्या नियमानुसार चेंडूचं वज हे 140 ते 149 ग्रॅम असेल. तर त्याचा आकारमान हा 21.5 ते 22 सेमी असेल. ज्युनिअर क्रिकेटमध्ये (अंडर 13) चेंडूचं वजन 133 ते 144 ग्रॅम आणि आकारमान 20.5 ते 22 सेमी होतं. पण या नियमात बदल केला आहे. आता वजन 140 ते 144 ग्रॅम असेल आणि आकारमान 20.5 ते 21 सेमी असेल.


