धक्कादायक प्रकार! रोजच्या दुधात डिटर्जंट-युरिया मिसळल्याचा आरोप,व्हिडीओ व्हायरल

मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपण रोज पिणारं दूध खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अंधेरी-पश्चिमेकडील कपासवाडी परिसरात दुधात भेसळ केली जात असल्याचा आरोप असून, या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन, या कथित भेसळ प्रकरणाचा भांडाफोड केल्याचा दावा केला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ अंधेरी-पश्चिमेकडील कपासवाडी परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे.

या व्हिडीओमध्ये दूध भेसळ करून विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि एक पोलीस व्यक्ती एका घरात छापा टाकताना दिसते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाच्या पिशव्या आणि इतर साहित्य आढळल्याचा आरोप आहे.व्हिडीओमध्ये एक खोली दिसते, जिथे दुधाच्या अनेक पिशव्या ठेवलेल्या आहेत.

व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या हातात पोलीस वापरतात तशी काठी (बॅटन) आहे. तो घरात प्रवेश करतो, तिथे एक पुरुष आणि एक महिला दिसतात. तो त्या व्यक्तीला “चल, बस आणि माल बनव” असं म्हणताना ऐकू येतं.समोरचा माणूस आपण काय चूक केली, असा प्रश्न विचारतो. पुढे त्या व्यक्तीकडून दूध कसं तयार केलं जातं, याची प्रक्रिया दाखवली जाते, असं व्हिडीओत दिसत आहे.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या दुधामध्ये डिटर्जंट पावडर, युरिया, साबणाचं द्रावण, रिफाईंड तेल आणि इतर रसायनं मिसळली जात असल्याच सांगितलं आहे. एक लिटर खऱ्या दुधात पाणी आणि रसायनं टाकून जवळपास दुप्पट दूध तयार केलं जात असल्याचंही सांगितलं जात आहे.या व्हिडीओखाली सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.

काही नेटिझन्स म्हणतायत, “हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.” तर काही जण प्रशासनावर प्रश्न उपस्थित करतायत “एफएसएसएआय आणि बीएमसी झोपेत आहेत का?” काही लोकांनी आपल्या लहान मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे; तर अनेकांनी याबाबत आवश्यक तपासणीसह कारवाई करून, दोषींवर कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles