राहुरी तालुक्यात आईने दीड वर्षाच्या मुलासह संपवले जीवन

राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला फासावर लटकवून नंतर स्वतः गळफास घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना दि. 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राहुरी तालुका हादरला असून कारण अद्याप अस्पष्ट आहे. आशा सुर्यभान आंबेकर (वय 31) व शिवांश सुर्यभान आंबेकर (वय दीड वर्षे, रा. चोपडे वस्ती, कोळेवाडी, ता. राहुरी) असे मृतांची नावे आहेत. या घटने बाबत मिळालेली माहिती अशी की, आशा सुर्यभान आंबेकर यांचा सुमारे तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. घरगुती कारणाच्या वादातून आशा आंबेकर या गेल्या एक वर्षांपासून माहेरी संगमनेर येथे राहत होत्या. चार-पाच दिवसांपूर्वीच त्या सासरी कोळेवाडी येथे आल्या.

दि. 15 जून रोजी रात्री आशा आंबेकर आपल्या दीड वर्षाच्या मुलासह दाराला आतून कडी लावून झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास आशा आंबेकर यांनी आपल्या राहत्या घरात अगोदर त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला दोरीच्या सहाय्याने फाशी दिली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. सुर्यभान आंबेकर हे दि. 16 जून 2024 रोजी सकाळी झोपेतून उठले. तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीतून आत डोकावले असता त्यांची पत्नी व दीड वर्षाचा चिमुकला मुलगा फासावर लटकल्याचे त्यांना दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून मृतदेह फासावरून खाली उतरवले. रुग्णवाहिकेतून आई व मुलाचा मृतदेह राहुरी (Rahuri) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आशा आंबेकर यांनी पोटच्या मुलाला फाशी देऊन स्वतः गळफास का घेतला ? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हृदय पिळवटून टाकणार्‍या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढिल तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles