काही दिवसांपूर्वी राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार समजले जाणारे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी राहुरीत येणार आहेत. या कार्यक्रमात प्राजक्त तनपुरे भाजपचे कमळ हातात घेतील, अशी चर्चा आहे. याविषयी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपल्याला तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाविषयी काही माहिती नसल्याचे सांगितले. त्या सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मी प्राजक्त तनपुरे यांच्याशी अनेकदा बोलली आहे. गेल्याच आठवड्यात आमचं बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते आता निवडणूक लढू इच्छित नाहीत. त्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आणि ते आता लढणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. पण पुढे आपण एकत्र काम करत राहू, असे ते गेल्याच आठवड्यात मला म्हणाले होते. माझ्या माहितीप्रमाणे प्राजक्त तनपुरे यावेळी विधानसभा लढणार नाहीत. ते कुटुंबासोबत कुठेतरी सुट्टीला जाणार होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पण प्राजक्त तनपुरे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शक्य असेल. पण ते मला तसं काही बोललेले नाहीत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.


