टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात नाशिकरोड सत्र न्यायालयाने फरार संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ४० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी नाशिक पोलिसांना तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. तांत्रिक पथकासह तीन पथके मागावर असतांनाही निदा गुंगारा देत होती. ही शोध मोहीम अखेरीस संपुष्टात आली असून निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
येथील टीसीएस कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतराचा प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकार समोर आले. देवळाली कॅम्पसह मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल असून आतापर्यंत या प्रकरणात सातहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणातील संशयित निदा खान मार्चच्या अखेरीस पहिला गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून फरार झाली होती. निदा ४० दिवसांपासुन पोलिसांना गुंगारा देत होती. या काळात निदा खानने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी नाशिकरोड सत्र न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मागील आठवड्यात न्यायालयाने निदाचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. पीडितेच्या धर्मांतराचे नियोजन करणे, रोजा धरणे, हिजाबचा वापर याविषयी तिला प्रशिक्षण, मालेगावसह परदेशातील काही धागेदोरे आदींचा तपशील मिळविण्यासाठी निदा सापडणे पोलिसांसाठी गरजेचे झाले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही तिचा शाेध घेतला जात होता.
टीसीएस कंपनीतील गुन्ह्यात निदा खानला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक आणि विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या संदर्भात माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर येथून निदा खानला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या मदतीने फरार निदा खानला पकडण्यात आले.
नाशिक टीसीएस प्रकरणात अपडेट, पोलिसांना ४० दिवस हुलकावणी देणारी निदा खान जेरबंद!
- Advertisement -


