राजकारणातील ९० टक्के खेळाडू हे वाटच पाहत असतात, कोणत्या पक्षाचे सरकार येते आणि कोण मंत्री बनतो. त्यांचे झेंडे, दंडे आणि हारतुरे तयारच राहतात. त्यांनी पक्ष का सोडला, हे त्यांनाही कळत नाही आणि ते ज्या पक्षात गेले, त्यांनाही उमजत नाही. मी हे कुणा व्यक्तीबद्दल बोलत नाही. पण, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकारणामध्ये तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि विचारनिष्ठा कमी झाली आहे, हे त्याचे खरे कारण आहे, अशा परखड शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्यांचे कान टोचले.अमरावतीत शिवपरिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही, तर विचारशून्यता ही खरी मोठी समस्या आहे. कधी जनता निवडून देत असते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचे व्यक्तित्व असे असते, की तो प्रवाहाच्या बरोबर वाहत जात नाही. जिवंत मासा हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत जात असतो. नेहमी काडी-कचरा, मृत मासे हे प्रवाहाबरोबर वाहत जाताना दिसतात. आपण स्वीकारलेली राजकीय विचारनिष्ठा ही जपणे अत्यंत महत्वाचे आहे. तेच आता दुर्लभ झाले आहे.गडकरी म्हणाले, राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणेचे साधन आहे. हा विचार शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता, म्हणून त्यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या.समाजसुधारक हे येणाऱ्या शतकांचा विचार करीत असतात. ज्याला समाजाचा, देशाचा विचार करायचा असतो, त्यांची योजना ही शंभर वर्षांची असते आणि ज्याला पुढची निवडणूक जिंकायची असते, त्याला स्वाभाविकपणे पुढच्या पाच वर्षांचा विचार करावा लागतो. पण, माझा अनुभव चांगला आहे. मी माझ्या विचारांशी तडजोड करणार नाही, हे मी ठरवून टाकले आणि सांगितले की जाती-पातीचे राजकारण कधीही करणार नाही. तुम्ही जाहीरपणे हे बोलू नका, असा सल्ला माझ्या काही मित्रांनी दिला. तुम्ही पराभूत व्हाल, असे ते म्हणाले होते. पण निवडणुकीत पराभूत झाल्याने कुणी संपत नसतो, मी कधीही पराभवाची चिंता केली नाही, असे गडकरी म्हणाले.


