अहिल्यानगर महापौरपद आरक्षण, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर निवडीला राज्यातील ओबीसी संघटानेच्या नेत्यांनी हरकत घेतली आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या या जागेवर ओबीसी जातीतील घटकांना रोटेशननुसार संधी द्यायला हवी, असे त्यांचे म्हणने आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या नेत्यांनी भूमिका मांडली आहे. महापौरपदाची निवडणूक झाल्यावर निव़ड़णूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे यांची उमेदवारी युतीकडून जाहीर झाली असून त्यांचा एकमेव अर्ज आहे. गाडे या ओबीसीमधील कुणबी घटकातील आहेत.
यावर ओबीसी नेत्यांचे म्हणने आहे की, ओबीसी नेत्यांचा मूळ आक्षेप हा केवळ व्यक्तीवर नसून, ‘रोटेशन’ पद्धतीनुसार ज्या ओबीसी उपजातींना संधी मिळायला हवी होती, त्यांना डावलले जात असल्यावर आहे. विशिष्ट राजकीय सोयीसाठी नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रक्रियेला स्थगिती द्यावी किंवा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“प्रस्थापित राजकीय पक्ष ओबीसी आरक्षणाचा वापर केवळ सत्तेसाठी करत आहेत, पण प्रत्यक्षात ओबीसी उमेदवारांना निर्णयप्रक्रियेत स्थान दिले जात नाही,” असा आरोप नेत्यांनी केला.
जर निवडणूक आयोगाने या हरकतीची दखल घेतली नाही, तर अहिल्यानगरमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचेही संकेत या परिषदेत देण्यात आले. केवळ अहिल्यानगर नव्हे तर राज्यात जेथे जेथे असे प्रकार झाले आहेत, तेथील मुद्दाही त्यांनी मांडला.
आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी जनमोर्चा आणि स्थानिक ओबीसी हक्क संरक्षण समितीच्या नेत्यांनी प्रमुख भूमिका मांडली. यासंबंधीची याचिका केलेले मंगेश ससाणे, प्रकाश शेंडगे (अध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा), प्रा. श्रावण देवरे (ओबीसी अभ्यासक आणि नेते), दशरथ राऊत (स्थानिक ओबीसी चळवळीतील सक्रिय नेते), बाळासाहेब कर्डिले आदींनी भूमिका मांडली.
अहिल्यानगर महापौरपद आरक्षण ओबीसी संघटानेच्या नेत्यांनी घेतली हरकत ; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
- Advertisement -


