महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारनेरच्या डॉक्टरला फासले काळे

​पारनेर -सोशल मीडियावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल अपमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील डॉक्टर डॉ. मंगेश बेकारसे याच्याविरोधात संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विकृत मानसिकतेचा निषेध करत संतापलेल्या भीमसैनिकांनी संबंधित डॉक्टरच्या तोंडाला शाई फासून, त्याला चपलांचा हार घालत चांगलाच धडा शिकवला. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित डॉक्टरवर तातडीने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भाळवणी येथील डॉक्टर डॉ. मंगेश बेकारसे याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि भीमसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. कोट्यवधी जनतेचे आराध्य दैवत असलेल्या महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान केल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या.

​या विकृत कृत्याचा जाब विचारण्यासाठी आणि आपला निषेध नोंदवण्यासाठी आज (दि. २९) मोठ्या संख्येने भीमसैनिक भाळवणी येथे एकत्र आले. संतप्त कार्यकर्त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या डॉ. मंगेश बेकारसे याला गाठून थेट जाब विचारला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी संबंधित डॉक्टरच्या तोंडावर शाई फेकली आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याचा जाहीर निषेध करत चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. महापुरुषांची विटंबना करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी आग्रही मागणी आता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles