सकल माळी समाजाचा अधिकृत खुलासा
राजेंद्र पडोळे यांनी लेटरपॅडचा गैरवापर करून समाजाची दिशाभूल केली
अहिल्यानगर – सकल माळी समाजाचे कामकाज हे समाजातील प्रमुख मान्यवर, दि. 10 जून 2024 रोजी निवड झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांवरील 150 पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित विचाराने सुरळीतपणे चालू आहे. या कामात अडथळा आणण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोक प्रयत्न करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे, असे सकल माळी समाजाने स्पष्ट केले आहे.
लेटरपॅडचा अनधिकृत वापर
सकल माळी समाज ट्रस्टच्या लेटरपॅडचा विना परवानगी आणि समाजाला विश्वासात न घेता वापर करून महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, धर्मादाय कार्यालय तसेच श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या नावाने राजेंद्र पडोळे यांनी निवेदने देऊन आमरण उपोषण आणि आंदोलनाची घोषणा केली आहे. या भूमिकेशी सकल माळी समाजाचा कोणताही संबंध नाही.
सरकार दरबारी देण्यात आलेल्या निवेदनावर सकल माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त तसेच कोणत्याही अधिकृत पदाधिकाऱ्याची सही नाही. तरीही समाजाला अंधारात ठेवून खोट्या स्वाक्षऱ्या करून वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यामुळे सकल माळी समाजात गैरसमज आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अनधिकृत वापरासंदर्भात राजेंद्र पडोळे यांना दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी लेखी नोटीस देण्यात आली आहे. सकल माळी समाजाच्या लेटरपॅडचा वापर हा केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अधिकृत परवानगीने होईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
नावे आणि फलकांचा गैरवापर
राजेंद्र पडोळे यांनी सुरुवातीला या सर्व मागण्या नगरसेविका माननीय सौ. सुजाताताई पडोळे यांच्या नावाने पत्राद्वारे महापालिकेकडे मांडल्या होत्या. आता त्याच मागण्या सकल माळी समाजाच्या बॅनरखाली आंदोलनाचा इशारा देत सरकार दरबारी मांडण्यात आल्या आहेत.
राजेंद्र पडोळे यांनी दिलेल्या निवेदनावर सकल माळी समाजाच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याची स्वाक्षरी नाही. तसेच शहरात लावण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या फलकांवरील जी नावे आहेत, त्यांनाही विश्वासात न घेता त्यांची नावे बळजबरीने वापरली आहेत. याबाबत समाज बांधवांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, “आम्हाला न विचारता आमची नावे फलकावर टाकण्यात आली आहेत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आंदोलनाला समाजाचा पाठिंबा नाही
राजेंद्र पडोळे यांनी दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सकल माळी समाजाचे स्वतंत्र व्यासपीठ आहे. परंतु वैयक्तिक फायद्यासाठी आणि समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यासाठी सकल माळी समाजाच्या नावाचा वापर करून राजेंद्र पडोळे यांनी केलेल्या आमरण उपोषणास सकल माळी समाज बांधवांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देण्यात आलेला नाही, असे सकल माळी समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
यापुढील काळात राजेंद्र पडोळे यांनी घेतलेल्या कोणत्याही उपक्रमांशी सकल माळी समाजाचा सहभाग व पाठिंबा राहणार नाही. याची शहरातील व जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
राजेंद्र पडोळे यांना नगरसेवक घराण्याचा राजकीय वारसा लाभला असल्याने त्यांनी राजकीय बॅनर घेऊनच शहराच्या समस्या सोडवाव्यात,अशी सकल माळी समाजाची मागणी आहे.
सकल माळी समाजाचे अध्यक्ष- किशोर डागवले उपाध्यक्ष-बाळासाहेब भुजबळ


