पान दुकानदारांचा आझाद मैदानावर एल्गार. मागण्यांसाठी राज्यव्यापी धडक मोर्चा

पान दुकानदारांचा आझाद मैदानावर एल्गार. मागण्यांसाठी राज्यव्यापी धडक मोर्चा संपन्न.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने पान दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १४ जुलै २०२६) मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धडक मोर्चा व धरणे आंदोलन उत्स्फूर्त वातावरणात पार पडले. राज्यभरातील हजारो पान दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासन तसेच इतर यंत्रणांकडून पान दुकानदारांवर होत असलेल्या कारवायांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर महासंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांची मंत्रालयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी पान दुकानदारांच्या मागण्या गांभीर्याने विचारात घेतल्या जातील तसेच संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पान दुकानदारांना न्याय मिळेल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केल्याची माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या आंदोलनात मोक्का कायद्याचा चुकीचा वापर थांबविणे, अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायकारक कारवाया रोखणे, सुगंधी तंबाखूवरील बंदीचा पुनर्विचार करणे, पान शॉप व्यावसायिकांना आर्थिक मदत, अनुदान व विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे, पान व्यवसायाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, कार्याध्यक्ष शरद मोरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष फैय्याज तांबोळी, लातूर जिल्हाध्यक्ष मसूद काझी, सांगली जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, दिनेश बरंवाल, अजिंक्य पाटील यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी केले.
महासंघाच्या वतीने या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, पान दुकानदारांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles