दुसऱ्याच्या कामांचे उदघाटन कशाला करता? खासदार नीलेश लंके यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा ; व्हिडीओ

दुसऱ्याच्या कामांचे उदघाटन कशाला करता?

खासदार नीलेश लंके यांचा पालकमंत्री विखेंवर जोरदार हल्लाबोल

पारनेर : प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत विकासकामांच्या श्रेयावरून थेट सवाल उपस्थित केला आहे.

कान्हुर पठार येथे आयोजित कार्यक्रमात खा. लंके हे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्या जिल्ह्याचे आदर्श पालकमंत्री पारनेर तालुका दौऱ्यावर आहेत. तुम्ही स्वतःची कामे मंजूर करा आणि मग उदघाटन करा. नीलेश लंके यांनी मंजूर केलेल्या कामांचे उदघाटन कशाला करता? असा थेट सवाल खासदार लंके यांनी उपस्थित केला.

खासदार लंके पुढे म्हणाले की, पळशी येथे सात कोटी रुपयांची आश्रमशाळा मी मंजूर करून बांधली. त्या शाळेचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. तसेच पारनेरचे बसस्थानक आणि कोर्टाची इमारतही मी मंजूर करून आणली आहे. मात्र त्या कामांची पाहणी पालकमंत्री करत आहेत.

यावेळी त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत, मी दुसऱ्याच्या कामांची पाहणीसुद्धा करत नाही आणि दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांवर जातही नाही. मी आमदार झाल्यापासून कोणाच्याही कामाचे खोटं उदघाटन केलेलं नाही. आपल्या झेंड्यावर छाती काढून मी पंढरपूरला जात असतो. दुसऱ्याच्या कामाचे चोरट्या भामट्यावाणी भूमिपूजन मी करत नसतो, असे म्हणत पालकमंत्री विखे पाटील यांना टोला लगावला.

तुम्ही तुमची कामे मंजूर करा आणि नंतर उदघाटन करा. तुमच्या राजकीय कारकिर्दीत काय केलं ते जनतेसमोर ठेवा. फक्त जिरवा-जिरवी केली; मात्र विकासाची ठोस कामे केली नाहीत,अशा शब्दांतही खासदार लंके यांनी टीका केली. राजकीय वातावरण अधिक तापवत खासदार लंके म्हणाले, स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायला शिका. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करू नका,असा खोचक टोला त्यांनी लगावला.

याचवेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांवर चर्चा झाली नाही. ज्याला जे करायचे ते करू द्या. आपला पारनेर तालुका स्वाभिमानी आहे आणि तो तसाच स्वाभिमानी ठेवावा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles