पुणे: विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यानंतर त्यांनी जय अजित पवार यांच्याशी असलेल्या १० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत भूमिका मांडली आहे.
मला हवा असलेला एक भूखंड जय अजित पवार यांच्या नावे होता. त्यामुळे त्यांच्याशी तो व्यवहार करावा लागला. त्या व्यवहारापोटी १० कोटी रुपयांचे मी जय पवार यांना कर्ज नव्हे, तर ती आगाऊ रक्कम दिली होती,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काकडे यांनी स्पष्टीकरण दिले.
काकडे यांनी जय अजित पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याबाबत विक्रम काकडे यांच्याकडे माध्यमांनी विचारणा केली. त्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘मी जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याच्या बातम्या सकाळपासून पाहत आहे. मात्र, प्रत्यक्षात ते कर्ज नाही. भूखंडासाठीची दिलेली आगाऊ रक्कम आहे. प्रतिज्ञापत्रात एक स्वतंत्र कॉलम आहे. त्यामध्ये कर्ज किंवा आगाऊ रक्कम दिल्याचा उल्लेख करावा लागतो. त्यानुसार त्यामध्ये मी दिलेल्या रकमेचा आगाऊ किंवा कर्ज या वर्गवारीच्या प्रकारात उल्लेख केला आहे. मी जय पवार यांना कर्ज दिले नाही,’ असेही काकडेंनी स्पष्ट केले.
विक्रम संजय काकडे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुसऱ्याच क्षणी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना काकडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्ती दीडशे कोटींहून अधिक असल्याचे म्हटले आहे


