नगर शहरात ऑनलाईन ‘बिंगो’ जुगारावर छापा;सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर -शहरातील तपोवन रस्ता परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. इंडो आयरिश रूग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो नावाचा हार-जितीचा खेळ खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणार्‍या आणि चालवणार्‍या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला असून सुमारे एक लाख 96 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अंमलदार आकाश काळे यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संतोष सुर्यभान तागड (रा. तागड वस्ती, पाईपलाईन रस्ता), संतोष भाऊसाहेब फणसे (रा. फणसेमळा, तपोवन रस्ता), ओंकार ठोंबरे (रा. पद्मानगर, सावेडी), विशाल आनंद (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), राहुल अनिल फणसे, पुष्कर जगदीश पाषाण (दोघे रा. तपोवन रस्ता), कांचा ऊर्फ महावीर कमलाकर कोंडेकर (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संतोष तागड हा ओंकार ठोंबरे याच्या सांगण्यावरून हा जुगार अड्डा चालवत होता.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा संतोष तागडसह संतोष फणसे, राहुल फणसे, पुष्कर पाषाण आणि कांचा उर्फ महावीर कोंडेकर हे जागीच जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी संगणक संच, इंटरनेट मोडेम, विविध कंपन्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ओंकार ठोंबरे आणि विशाल नावाचा इसम सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संशयित एका विशिष्ट वेबसाईटचा आयडी आणि पासवर्ड वापरून हा अवैध धंदा चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles