Wednesday, November 12, 2025

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल…

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केले आहे. हा पवार कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

न्यायालयाने अद्याप या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली होती. जानेवारी 2023 मध्ये ईडीने बारामती अ‍ॅग्रोच्या ठिकाणांसह विविध ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

मार्च 2023 मध्ये ईडीने बारामती अ‍ॅग्रोच्या 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या, ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे असलेली 161.30 एकर जमीन, एक साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारती यांचा समावेश होता. ईडीचा दावा आहे की, ही मालमत्ता मूळतः कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) यांच्याकडे होती, मात्र ती बारामती अ‍ॅग्रोने कथित बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केली. ईडीच्या मते, संबंधित मालमत्ता ही गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेच्या स्वरूपात असल्याने ती मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन ठरते.

ईडीचा तपास हा ऑगस्ट 2019 मध्ये आर्थिक गुन्हे शाखा , मुंबई यांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. या एफआयआरमध्ये भारतीय दंड विधान आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. एफआयआरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी आणि संचालकांनी अनेक सहकारी साखर कारखाने (एसएसके) बेकायदेशीरपणे अत्यंत कमी किमतीत त्यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या खाजगी कंपन्यांना विकले. ही विक्री पारदर्शक प्रक्रिया न पाळता आणि कायदेशीर औपचारिकता टाळून करण्यात आली होती.

2009 मध्ये एमएससीबीने कन्नड एसएसकेकडून 80.56 कोटी रुपयांचे थकित कर्ज वसूल करण्यासाठी त्या कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला होता. त्यानंतर बँकेने संशयास्पद मूल्यांकनाच्या आधारे कमी राखीव किमतीत लिलाव प्रक्रिया सुरू केली. ईडीचा आरोप आहे की, ही लिलाव प्रक्रिया देखील गंभीर गैरव्यवहारांनी भरलेली होती. कमकुवत आणि विवादित कारणांचा हवाला देत सर्वाधिक बोली लावणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला अपात्र ठरवण्यात आले, तर बारामती अ‍ॅग्रोशी जवळीक असलेल्या व्यक्तीला, ज्याची आर्थिक पात्रता आणि अनुभव संशयास्पद होता, त्याला लिलावात कायम ठेवण्यात आले.

ईडीच्या मते, या प्रकरणात आतापर्यंत तीन वेळा तात्पुरत्या जप्तीचे आदेश जारी करण्यात आले असून, त्याअंतर्गत एकूण 121.47 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्तीला आता अंतिम मान्यता मिळाल्यानंतर, ईडीने न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हा रोहित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण रोहित पवार यांचं नाव आरोपी म्हणून चार्जशीटमध्ये घेण्यात आलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles