ग्रामीण विकास मंडळ एमआयडीसी नागपूर संस्थेच्या अध्यक्षपदी संपत बारस्कर यांची बिनविरोध निवड

ग्रामीण विकास मंडळ एमआयडीसी नागपूर संस्थेच्या अध्यक्षपदी संपत बारस्कर यांची बिनविरोध निवड

धर्मदाय उपायुक्त कार्यालयाची मंजुरी; शिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात

मुख्य विश्वस्तपदी इंजि. बबनराव कातोरे तर सचिवपदी डॉ. भूषण अनभुले यांची निवड

अहिल्यानगर : ग्रामीण विकास मंडळ एमआयडीसी नागपूर माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच मुख्य विश्वस्त प्रवर्तकपदी इंजिनिअर बबनराव कातोरे तर सचिवपदी डॉ. भूषण अनभुले यांची निवड करण्यात आली असून धर्मदाय उपायुक्त कार्यालय, अहिल्यानगर यांनी या निवडीस अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
संस्थेच्या मागील कार्यकारी मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर दिनांक ९ मे रोजी संस्थेच्या आजीव सभासदांची सभा पार पडली. या सभेमध्ये संस्थेच्या घटनेतील कार्यकारी मंडळ निवडीच्या तरतुदीनुसार नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. त्यानंतर सदर बदल अर्ज धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्या अर्जास अखेर मंजुरी मिळाल्याची माहिती नूतन अध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.
या नव्या कार्यकारी मंडळामध्ये उपाध्यक्षपदी रावसाहेब सप्रे, खजिनदारपदी सुदाम भोर, विश्वस्त प्रवर्तक म्हणून प्रकाश गुगळे, शरद भोर, शांताराम गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारी सदस्य म्हणून दिगंबर सप्रे, ॲड. विक्रम वाडेकर, प्रवीण कातोरे, क्रांतीकला अनभुले, भालचंद्र शिरोडे, भगवान हावरे आणि निर्मला मुळे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण, शहरी तसेच एमआयडीसी परिसरातील कामगारांच्या मुलांना माफक फीमध्ये उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
ते पुढे म्हणाले की, “गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर देत त्यांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. संस्था नावारूपाला आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम केले जाईल.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

(चौकट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांची ग्रामीण विकास मंडळ एमआयडीसी नागपूर संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे संपत बारस्कर यांनी याच संस्थेच्या शाळेमध्ये अकरावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. संस्थेचा विद्यार्थी ते संस्थेचा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles