जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी संध्याताई सोनवणे यांची निवड.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची घोषणा केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई उद्धव सोनवणे यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा नियोजनाच्या विविध विषयांतील अनुभव व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संध्याताई सोनवणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर कार्यरत असून, महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्न, ग्रामीण विकास आणि विविध लोकहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या विकास नियोजनात महिला प्रतिनिधित्व अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या निवडीचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वागत केले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी संध्याताई सोनवणे यांची निवड
- Advertisement -


