अकोळनेर जिल्हा परिषद शाळेतील वाद चिघळला.
शिक्षिकेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव, प्रभारी मुख्याध्यापिकांवर छळ व बदनामीचे गंभीर आरोप.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंतर्गत वाद आता जिल्हा परिषद प्रशासनापर्यंत पोहोचला असून, शिक्षिका सीमा हरिभाऊ गावडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन देत प्रभारी मुख्याध्यापिका यांच्यावर मानसिक छळ, बदनामी, बदलीसाठी कटकारस्थान रचणे तसेच पूरक पोषण आहाराच्या वितरणात अनियमितता केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात सीमा गावडे यांनी म्हटले आहे की, त्या गेल्या दहा महिन्यांपासून अकोळनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. अविवाहित, अनाथ व निराधार असल्याचा गैरफायदा घेत प्रभारी मुख्याध्यापिका त्यांना सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, दर बुधवारी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराचे १७ जून व २४ जून २०२६ रोजी वितरण झाले नसल्याबाबत त्यांनी मुख्याध्यापिकांना विचारणा केली. त्यानंतर मुख्याध्यापिकांनी सरपंचांच्या माध्यमातून आपल्याविरोधात वातावरण निर्माण करून बदलीसाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावर्षी चौथीतील सुमारे ४० विद्यार्थी पाचवीत गेल्याने शाळेतील विद्यार्थीसंख्या कमी झाली असून, अतिरिक्त शिक्षक ठरण्याची शक्यता टाळण्यासाठी आपल्याला बदलीने हटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा ही त्यांनी निवेदनात केला आहे.
सीमा गावडे यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्याध्यापिका वारंवार वर्गात येऊन विद्यार्थ्यांसमोर मोठ्या आवाजात वाद घालत होत्या. त्यामुळे आपला अपमान होत असून मानसिक छळ वाढला. यापूर्वी केंद्रप्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापिकांना तोंडी समज देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही त्रास सुरूच राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांवरही त्यांनी गंभीर आरोप करत, सरपंच हे मुख्याध्यापिकांचे नातेवाईक असून त्यांच्या माध्यमातून पालकांना भडकविण्यात आले. २५ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पालकांची बैठक घेऊन आपल्याविरोधात तक्रार अर्ज तयार करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर खोटे आरोप व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आपण विद्यार्थ्यांना कधीही मारहाण केलेली नाही, अपशब्द वापरले नाहीत किंवा विद्यार्थ्यांचा डबा खाल्लेला नाही. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपली उपस्थिती व कामकाज स्पष्ट दिसून येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
२७ जून रोजी विद्यार्थ्यांची मूल्यमापन परीक्षा निष्पक्षपणे न घेता आपल्या अनुपस्थितीत घेण्यात आली. परीक्षेबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण करून त्याचा नकारात्मक अहवाल सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यामुळे आपली बदनामी होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडले असून आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा तसेच निपुण चाचणीचा अहवाल समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, बेरीज-वजाबाकीमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक प्रगती साधल्याचे त्यांनी पुराव्यासह नमूद केले आहे.
मुख्याध्यापिकांनी बदली प्रक्रियेत दिव्यांग मुलाच्या कारणावरून शासनाची दिशाभूल करून बदलीतून सूट मिळविल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीचे अँड स्वाती जाधव यांच्यासह शिक्षिका सीमा गावडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
नगर तालुक्यातील अकोळनेर जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकांवर छळ व बदनामीचे गंभीर आरोप
- Advertisement -


