शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदेंना बेदम मारहाण, आरोपीत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टारचा समावेश

बीडमधील गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर, आरोपींच्या महिला नातेवाईकांनी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वादग्रस्त रील स्टार कोमल काळे हिने शिंदे यांच्या घरात घुसून पुन्हा धिंगाणा घातला. “तक्रार मागे घे, नाहीतर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी या महिलांनी दिली असून, हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण शिंदे यांनी गेवराई तालुक्यातील नागझरी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याचाच राग धरून प्रवीण ऊर्फ लल्ल्या शिंदे, विकास आव्हाड आणि माऊली भवर या तिघांनी नारायण शिंदे यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने शिंदे यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर शिंदे यांनी तात्काळ गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच वाळू माफियांच्या महिला नातेवाईक आक्रमक झाल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टार कोमल काळे हिला सोबत घेऊन काही महिलांनी नारायण शिंदे यांचे घर गाठले. “हल्ल्याची तक्रार पोलिसात का केली?” असा जाब विचारत या महिलांनी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.

एवढ्यावरच न थांबता, “गुन्हा मागे घे, अन्यथा बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवू, घर आणि गाडी पेटवून देऊ,” अशी थेट धमकी त्यांनी दिली. तसेच नारायण शिंदे यांच्या पत्नी अश्विनी शिंदे यांचे हातपाय तोडून विहिरीत फेकून देण्याची धमकीही या महिलांनी दिली.

घरात घुसून महिलांनी केलेल्या या मारहाणीचा आणि दमदाटीचा संपूर्ण प्रकार शिंदे यांच्या घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे गेवराई पोलीस ठाण्यात रील स्टार कोमल काळेसह इतर महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी अद्याप एकाही मुख्य आरोपीला अटक केलेली नाही. केवळ एका आरोपीला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिसांच्या या संथ कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles