अहिल्यानगर शहरामध्ये लव जिहादची घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह करुन तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने जुनेद शेख या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मला न्याय मिळावा अशी मागणी पीडितेने महिला आयोगाकडे केली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथे महिलेची जुनेद शेखशी एका दुकानामध्ये ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात झाले. पीडितेला वेगवेगळी आमिषे दाखवत २०१९ मध्ये कापूरवाडी येथील एका मौलानाच्या घरी पीडिता आणि जुनेद शेख यांचा आंतरजातीय विवाह केला.
जुनेद शेखचा याआधीही विवाह झाला होता. याबाबतची माहिती त्याने पीडितेपासून लपवून ठेवली. जुनेदने पीडितेला शहरातील एका वस्तीमध्ये ठेवले. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. आता विवाह आणि आमच्या मुलाला जुनेद नाकारत आहे, त्याने माझी फसवणूक केली आहे असे पीडित तरुणीने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.
‘माझ्या घरी (माहेरी) जायचे आहे’, असे पीडितेने अनेकदा जुनेदला म्हटले. पण त्याने प्रत्येक वेळी पीडितेला घरी जाण्यास नकार देत असे. यावरुन जाब विचारला असताना जुनेदने पीडितेला वारंवार मारहाण केली. कुटुंबीयांकडून माझ्यावर वारंवार दबाव टाकला जात असल्याचे पीडितने म्हटले आहे. या विवाहाचे सर्व पुरावे पीडितेने दिले आहेत. मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी तिने महिला आयोगाकडे केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.


