नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या राज्यभरात मोठी चर्चा होत आहे. महिलेवरील अत्याचाराशी संबंधीत अशोक खरातची धक्कादायक प्रकरणे आता एकापाठोपाठ एक समोर येऊ लागली आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावे लागले आहे. सध्या विविध स्तरातून या प्रकरणी सरकारवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे खरातला पोलिसांनी अटक केली असून त्याची एसआयटी चौकशी केली जात आहे. यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.
राज ठाकरेंची संपूर्ण पोस्ट
राज ठाकरेंनी अशोक खरात आणि राजकारणी यांच्या संबंधांवर परखडपणे भाष्य करणारी पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा ‘गीतारहस्य’ सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब ‘तीर्थ’ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले, नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने…
- Advertisement -


