श्रीरामपूर -शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात गुन्हेगारीविरोधात धडक मोहीम राबवित 68 आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवायांमध्ये शस्त्रे, अंमली पदार्थ, वाहने व रोकडसह तब्बल 41 लाख 72 हजार 736 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हत्यार कायद्यांतर्गत कारवाई
भारतीय हत्यार कायद्यान्वये तीन कारवाया करताना 2 गावठी कट्टे, 5 जिवंत काडतुसे, 3 धारदार चॉपर, मॅगझिन, एर्टिगा कार व मोबाईल असा 6 लाख 27 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंमली पदार्थांविरोधात कारवाई
गांजा व एम.डी. (मेफेड्रोन) तस्करीप्रकरणी दोन कारवायांमध्ये 604 ग्रॅम गांजा, 4.830 मिग्रॅ एम.डी., बर्गमॅन मोपेड व मोबाईल असा 2 लाख 80 हजार 421 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच 12 ऑगस्ट रोजी किया सोनेट कार व 4 किलो गांजासह 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीच्या दुचाकी हस्तगत
तांत्रिक तपासाच्या आधारे सचिन भगवान उमाप यास ताब्यात घेऊन चोरीच्या 3 मोटारसायकली, किंमत 80 हजार रुपये, हस्तगत करण्यात आल्या.
अवैध व्यवसायांवर कारवाई
जुगार कायद्यान्वये 18 कारवायांमध्ये 9 लाख 52 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल, तर दारूबंदी कायद्यान्वये 26 कारवायांमध्ये 10 लाख 86 हजार 155 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तडीपार व हद्दपारीच्या कारवाईत मकोका कलम 142 अन्वये 5 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, 3 हद्दपारी प्रस्ताव पाठविण्यात आले. न्यायालयीन कारवाईअंतर्गत 121 वॉरंट व 176 समन्स बजावण्यात आले. तसेच उखचड प्रणालीवर 6 हजार 317 आरोपींची नोंद करण्यात आली आहे.
कॅफे व भंगार दुकानांवरही कारवाई
शालेय व महाविद्यालयीन परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेवासा रोडवरील क्रिस्टल, एमएच-17 व स्पार्कल या तीन कॅफेंवर मकोका कलम 110 व 117 अन्वये कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणार्या 4 भंगार दुकानदारांवर कलम 124 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
वाहतूक नियमभंग करणार्यांवर दंडात्मक कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 557 वाहनधारकांवर कारवाई करून 3 लाख 73 हजार 250 रुपयांचा दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला. याशिवाय 35 वाहनांचे मॉडिफाय सायलेंसर व 53 वाहनांच्या ब्लॅक फिल्म्स काढण्यात आल्या.


