शालार्थ आयडी घोटाळ्यात नगरच्या शिक्षणाधिकार्‍यांना एसआयटीची नोटीस

जळगाव येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) जळगाव जिल्ह्यातील विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच तत्कालीन 11 शिक्षणाधिकार्‍यांसह एकूण 48 अधिकार्‍यांना नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. त्यात नगरचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांचा समावेश आहे. त्यांनाही चौकशीची नोटीस आली आहे. ते 2021 पूर्वी जळगाव येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.

शालार्थ आयडी घोटाळ्याचा उलगडा झाल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यभरात 600 हून अधिक शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते. या आयडींच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेला फसवून कोट्यवधी रुपयांचा पगार काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शालार्थ प्रणाली ही शिक्षक व कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी वापरली जाणारी महत्त्वाची शासकीय डिजिटल यंत्रणा असून, त्यात अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एसआयटी तपासात 2013 ते 2026 या 13 वर्षांच्या कालावधीत नाशिक विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 892 कर्मचार्‍यांच्या शालार्थ आयडीमध्ये अनियमितता आढळून आल्या आहेत.

या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचा सहभाग लक्षणीय असल्याचे तपासात उघड झाले आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या 48 जणांमध्ये कल्पना चव्हाण, आर. डी. विसपुते, एस. बी. हिंगोणेकर, एस. टी. वराडे, डी. पी. महाजन, बी. जे. पाटील, बी. एस. अकलाडे, डॉ. नितीन बच्छाव, सचिन परदेशी, डॉ. किरण कुंवर, डॉ. एम. व्ही. कदम यांच्यासह 11 उपशिक्षणाधिकारी, तीन कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. या सर्वांकडून कागदपत्रांची पडताळणी, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि आर्थिक व्यवहारांबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सर्वांना 15 ते 18 एप्रिलदरम्यान नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles