अहिल्यानगर पुणे बसस्थानक परिसरात एसटी कर्मचार्‍याचे अपहरण करून मारहाण

अहिल्यानगर- पुणे बसस्थानक परिसरातून एका एसटी कर्मचार्‍याला तीन अनोळखी तरूणांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बुरूडगाव रोड परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड विचारून घेत 7 हजार 100 रूपये एका खात्यावर ऑनलाइन वर्ग केले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी संग्राम गोपाळकृष्ण झेंडे (वय 33, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 18 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेंडे हे एसटी महामंडळाच्या शिरूर (जि. पुणे) येथील आगारात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. 15 ऑगस्ट रोजी कामानिमित्त गुजरातमधील सुरत येथे जाण्यासाठी ते चिखली येथून सायंकाळी सहाच्या सुमारास निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास ते नगर येथील पुणे बसस्थानकावर आले होते. त्यावेळी ते फोनवर बोलत उभे असताना सुमारे 22 ते 23 वर्षे वयाचे तीन अनोळखी तरूण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. आम्ही तुम्हाला ट्रॅव्हल्सपर्यंत सोडतो, असे त्यांनी सांगितले. मात्र झेंडे यांनी त्यांना नकार दिला.

नकार दिल्यानंतरही या तिघांनी झेंडे यांना बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसविले आणि बुरूडगाव रोड परिसरात नेले. तेथे त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर मारहाण व दमदाटी करून मोबाईलचा पासवर्ड विचारून घेण्यात आला. फोनपेच्या माध्यमातून 7 हजार 100 रूपये श्री गणेश मोबाईल अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीजच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे वर्ग केल्यानंतर आरोपींनी झेंडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles