अहिल्यानगर जिल्ह्यातील ड्रग्ज माफीयावरून राजकारण तापलं आहे. खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात वाॅर रंगला आहे. एकमेकांचे कार्यकर्ते, नेते कसे ड्रग्ज तस्कारांबरोबर फिरतात, याचे फोटो व्हायरल करत आहेत. यातून ड्रग्ज माफीयांचे राजकीय संबंधांची चर्चा सुरू आहेत.
विखे अन् लंके एकमेकांच्या बालेकिल्ल्यातील गुन्हेगारीकडे देखील बोट दाखवत आहे. यातून आता शिर्डीतील गुन्हेगारांबरोबर राहण्यावरून सुजय विखे पाटलांनी आपल्या नगरसेवकांना तडाखेबंद इशारा दिला आहे. गुंडांबरोबर दिसला, ते खपवून घेणार नाही, असे नगरसेवकांना सुनावताना, सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
सुजय विखे पाटील शिर्डी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, शिर्डीतील गुंडगिरीवर निशाणा साधला. तसंच शिर्डीतील विकासासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र यावं, असं आव्हान केलं. ते म्हणाले, “शिर्डीच्या विकासासाठी एकत्र यावं. पण समोरचा चाकू मारताना, विचार करणार नाही की, हा भाजपचा गोंदकर आहे की, सेनेचा गोंदकर? शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा कोते आहे की, कमळाचा कोते? तो चाकू मारणारच! या गुन्हेगारांविरोधात सर्व पक्षीयांनी एक मूठ करावी.”‘मी एक व्हिडिओ पाहिला. एक आरोपी सुटला. गाडीमध्ये येतो. काही तरी, व्हिडिओचा तमाशा केला. फक्त दोन दिवस द्या, या सर्वांचा कपडे काढूनच शिर्डीत वरात काढतो. हा सुजय विखेंचा शब्द. हा तमाशा, थांबवा. शिर्डीला आव्हान आहे, कार्यकर्ता कोणाचाही असो, पण जर गुंडगर्दी, गुन्हेगारांबरोबर दिसलात. आता टाॅलेरेस्ट लेव्हल नाही. सर्व नगरसेवकांची जबाबदारी आहे,’ असे ठणकावून सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
‘जेवढे गुन्हेगार कार्यकर्ते असतील, ते लांब करा, सुधारायला सांगा. नाहीतर शिर्डीतून डायरेक्ट हद्दपार करणार आहे. हे काम सुरू करतो आहे. हा तमाशा शिर्डीत स्वीकारला जाणार नाही. कोणीही असो. मतदानासाठी लाचारी पत्करणं सोडलं आहे. शिर्डी सुरक्षित राहील, महिला सुरक्षित राहतील. मुली सुरक्षित राहतील. जो शब्द विधानसभेला दिला आहे, जो शब्द नगरपालिकांना दिला आहे, तो शब्द पूर्ण करणार,’ असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.


