राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार! सुनील तटकरे म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने थांबवली, तसेच याबाबतचा चेंडू त्यांच्याच कोर्टात असल्याचे संकेत दिले आहेत. तटकरे यांनी गुरूवारी (१६ जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी बुधवारी बैठक झाल्यानंतर सुनील तटकरे यांचे वक्तव्य समोर आले आहे. सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीबाबत मला माहिती का देण्यात आली नाही, अशी विचारणा सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना केली. या भेटीमुळेच विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडली होती. बहुसंख्य आमदारांना घेऊन अजित पवार हे महायुतीत सहभागी होऊन सत्तेत सामील झाले होते. दरम्यान, जानेवारीत त्यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांमुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर एक आव्हान निर्माण झाले.
“अजित पवार असताना दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्या होत्या. त्यांनी (अजित पवारांनी) घेतलेल्या विलीनीकरणाच्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले असते. पण, त्यांच्या निधनानंतर चर्चा थांबल्या. त्यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) नेत्यांनी राज्य पातळीवरील एका कार्यक्रमात विलीनीकरणाचा मुद्दा आता संपला आहे, असे घोषित केले. जर चर्चा पुन्हा सुरू झाली तर आम्ही आमचे मत मांडू”, असे तटकरे यांनी म्हटले आहे. विलीनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्याचा चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात असल्याचे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी विलीनकरणाबाबत चर्चा सुरू होती, हे सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच कबूल केले आहे. अजित पवार हे विलीनीकरणाच्या दिशेने पाऊलं उचलत होते, असे स्पष्ट संकेत तटकरेंनी दिले आहेत. अजित पवार यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने एक वृत्त प्रकाशित केले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा ८ फेब्रुवारी रोजी होणार होती, परंतु, त्याआधीच विमान अपघातात अजित दादांचे दुर्दैवी निधन झाले, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रकाशित केले होते. विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचली होती, दोन्ही पक्ष त्याची तयारी करत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृतपणे विलीनीकरण होणार होते, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles