उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांचा पत्ता कट करत पक्षाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातील माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे भुजबळ यांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न भंगले असून, त्यांचे समर्थक देखील नाराज झाले आहेत. याबाबतचा रोष त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फलक लावून व्यक्त केला आहे.छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने राज्यसभेची उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या येवला मतदारसंघात समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून आपला जाहीर निषेध आणि नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टर्सवर ‘साहेब निर्णय घ्या’ असा थेट आणि मोठा मजकूर लिहिण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी आता भुजबळांना पुढील राजकीय पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता भुजबळ कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी आपण राज्यसभेवर गेल्यावर त्याजागी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देऊन त्यांना आपल्याकडे असलेले मंत्रिपद द्यावे, अशी अट घातली होती. याकरिता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना हायकमांडशी चर्चा करून कळविणार असल्याचे सांगितले होते. पंरतु, भाजपच्या दिल्लीतील हायकमांडने राज्य मंत्रिमंडळाचा सध्या विस्तार करण्यास नकार दिल्याने भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली.यानंतर राष्ट्रवादीने रविवारी राज्यसभेच्या जागेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर मंत्री भुजबळ यांनी सोमवारी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण देखील दिले होते.


