तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी डीएमके आणि एआय डीएमके या दोन्ही पक्षांना बाजूला सारून अभिनेता विजय थलापति यांच्या पक्षाला सत्तेच्या समीप नेले. या निकालाची देश पातळीवर चर्चा सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचे अनेक मंत्री पराभूत झाले. यात एक अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. डीएमकचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा केवळ एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी टीव्हीके चे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी ८३,३७५ मते मिळवली, तर पीरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन ३० मतांनी आघाडीवर होते, मात्र अंतिम फेरीतील एका मताने पूर्ण समीकरणच बदलून टाकले.
मतदारसंघातील आर. पलकुरीची पंचायतीच्या २ हजारांहून अधिक मतदारांनी प्रशासकीय सीमा वादाचे निराकरण न झाल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला. पीरियाकरुप्पन हे डीएमकेचे मोठे नेते मानले जातात. २००६ पासून ते सलग चार वेळा तिरुप्पत्तूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. २०२१ मध्ये सत्ता आल्यानंतर त्यांना ग्रामविकास मंत्री करण्यात आले. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी मनुष्यबळ आणि मंदिर प्रशासन मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. शिवगंगा जिल्ह्यात पक्षाचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


