पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आणि मुंबईत बदलीही झाली. परंतु त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. आता त्यांच्यावर लाच प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३० लाखांच्या लाचेच्या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील जमिनीच्या वादासंदर्भातील एक तक्रार अर्ज चौकशीसाठी तोटेवार यांच्याकडे आला होता. या प्रकरणात त्यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडून सुरुवातीला २ लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित २८ लाख रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून त्यांना पकडलं. ही कारवाई पुण्यातील बंडगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली. या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
या कारवाईच्या आदल्या दिवशीच तोटेवार यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती आणि त्यांची मुंबई येथे बदलीही करण्यात आली होती. पुणे पोलिस दलातून त्यांना कार्यमुक्तदेखील करण्यात आलं होतं. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्या लाचखोरी प्रकरणात अडकल्या. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावरील निलंबनासोबतच कार्यमुक्तीचा आदेशही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची पोलिस दलात चर्चा रंगली आहे.


