खुन करुन प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमीयुगुल जेरबंद, शेवगांव येथील खुनाचे गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेकडुन उकल.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 12/08/2025 रोजी मुंगी, ता. शेवगांव गांवचे शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे 30 वर्षे वयाचे अनोळखी प्रेत मिळुन आलेले होते. सदर बाबत शेवगांव पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यु रजि. नंबर 95/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यु रजि. दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा अकस्मात मृत्यु हा संशयास्पद असल्याने मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमुद अकस्मात मृत्युचे चौकशीकामी विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, भगवान धुळे व सारिका दरेकर अशांना नेमण्यात आले होते.
पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मयत याचे गळ्यास धारदार हत्याराने कापलेले दिसुन आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तसेच घटनाठिकाणचे आजुबाजुचे शेत मालक यांचेकडे विचारपुस केली परंतु काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. मयताचे प्रेत हे गोदावरी नदीचे पात्रामध्ये मिळुन आलेले असल्याने व गोदावरी नदी ही पैठण परिसरातुन वाहत येत असल्याने पथकाने पैठण तसेच छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे दाखल मिसींगची माहिती घेतली असता मयताचे वर्णनाशी मिळतीजुळती हकीगत असलेल्या इसमाची हार्सुल पोलीस स्टेशन, जि. छ. संभाजीनगर येथे मनुष्य मिसींग रजि. नंबर 62/2025 प्रमाणे मिसींग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मिसींगमधील नातेवाईकांचा शोध घेवुन त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी मयतास ओळखुन मयताचे नांव सचिन पुंडलिक औताडे वय 32 वर्षे, रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.
तपासकामी नेमण्यात आलेले पथक आरोपींची माहिती काढत असतांना सदरचे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन 1) श्री दुर्गेश मदन तिवारी रा. वडोद, (कान्होबा), ता. खुलताबाद, जि. छ. संभाजीनगर, 2) श्रीमती भारती रविंद्र दुबे रा. फ्लॅट नं. 201, , एस. एस. मोबाईल शॉपी जवळ, कॅनोट प्लेस सिडको, जि. छ. संभाजीनगर यांचेकडे चौकशी केली तसेच त्यांना अधिक चौकशीकामी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे दिनांक 18/08/2025 रोजी बोलावुन घेवुन त्यांना विश्वासात घेवुन तपास करता त्यांनी मयत नामे सचिन पुंडलिक औताडे यास दिनांक
31/07/2025 रोजी रात्रीचे वेळी बोलावुन घेवुन त्यास प्रेमसंबंधातील वादाचे कारणावरुन त्यांचा साथीदार 3) अफरोज खान पुर्ण नांव माहित नाही रा. खटखट गेट, ता. जि. छ. संभाजीनगर यास बोलावुन घेवुन मयताचा चाकुने गळा कापुन खुन केल्याचा व अफरोज खान याचेकडील कारमध्ये त्याचे प्रेत टाकुन प्रेताची तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकु, कपडे याची विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली आहे. मयताचा भाऊ राहुल पुंडलिंक औताडे याने दिलेल्या तक्रारीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे दिनांक 17/08/2025 रोजी आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सलग 4 दिवस तपास करुन मयताची ओळख पटवुन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. ताब्यातील आरोपींना शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


