Tuesday, October 28, 2025

मोठी बातमी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक जुलैनंतर नोंदणी केलेल्यांना मतदानाचा हक्क नाही

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी मतदारयादी वापरली जाणार आहे. १ जुलै २०२५ रोजी अंतिम करण्यात आलेली ही यादी ग्राह्य धरली जाणार असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाच्या यादीनुसार शहरातील ३५ लाख मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे.

‘महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभागनिहाय, मतदान केंद्रनिहाय या यादीची फोड केली जात होती. मात्र, या वेळी स्थानिक पातळीवरून मतदारयादी घेऊ नये, निवडणुकीसाठी केवळ आयोगाकडून देण्यात आलेली मतदारयादी ग्राह्य धरावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून यादी घेतली जाणार नाही.

निवडणूक आयोगाकडून मतदारयादी महापालिकेला मिळाली असून, लवकरच ती प्रभागनिहाय फोडण्याचे काम सुरू केले जाईल,’ असे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम करण्यात आलेली मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. हीच यादी पुण्यासह अन्य महापालिकांसाठी वापरणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ३५ लाख मतदारांची मतदारयादी महापालिकेकडे प्राप्त झाली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देण्यात आली असून, पुढील काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाला मतदारयादी मिळाली आहे. आता प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू केले जाईल. निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेली मतदारयादी वापरली जाणार आहे.पुणे महापालिकेची आगामी निवडणूक २०११ च्या लोकसंख्येनुसार घेतली जाणार आहे. २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीनुसार ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी ४० प्रभाग हे चार सदस्यांचे राहणार असून, एक प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव हा पाच सदस्यांचा प्रभाग सर्वांत मोठा असून, येथील लोकसंख्या १ लाख २३ हजार इतकी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles