राहुरी-प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकाम अनुदानाचा पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांनी आज सापळा रचून राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सात्रळ येथील कंत्राटी लिपिकासह तिघा लोकसेवकांवर कारवाई केली. ही कारवाई राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सापळ्यात अडकलेल्या आरोपींमध्ये ग्रामपंचायत सात्रळ (ता. राहुरी) येथील ग्रामविकास अधिकारी हैदर याकुब पटेल (वय 56 रा. राहुरी फॅक्टरी), याच ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे (वय 43 रा. सात्रळ) आणि पंचायत समिती राहुरी येथील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सचिन हौशीराम ब्राम्हणे (रा. लोणी, ता. राहाता) यांचा समावेश आहे. तक्रारदार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता आणि सन 2023 मध्ये त्यांचे घरकुल मंजूर झाले होते. बांधकामासाठी अनुदानाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये व दुसरा हप्ता 70 हजार रुपये त्यांना यापूर्वीच प्राप्त झाला होता.
मात्र बांधकामासाठीचा पुढील अनुदान हप्ता मंजूर करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात लिपिक डुकरे यांनी, पटेल व ब्राम्हणे यांच्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दि. 29 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे प्राप्त झाली होती. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान दि. 30 जुन 2026 रोजी तक्रारदार यांनी आरोपी पटेल व डुकरे यांची भेट घेतली असता, अनुदान मंजुरीच्या प्रक्रियेत मदतीच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची मागणी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आयोजित सापळा कारवाईत आरोपी डुकरे यांनी तक्रारदाराकडून प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली, तर आरोपी ब्राम्हणे यांनी ही रक्कम स्वीकारण्यास डुकरे यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 7 व 12 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी पार पाडली असून पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी पर्यवेक्षण केले. कारवाईच्या पथकात पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, तसेच पोलीस कर्मचारी चंद्रकांत भीमसेन, किशोर कुळधरण, शेखर वाघ व चालक दशरथ लाड यांचा समावेश होता. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.


