Wednesday, November 12, 2025

अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्षावर तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप ,दारू पिऊन महिलांना..

एकीकडे राज्यभरात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच आता अहिल्यानगर उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसंच नितीन दिनकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना ढाब्यावर बोलवणे, बियरबारमध्ये बोलवणे, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणे अशाप्रकारे पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत, अशा पद्धतीची लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात दिनकर यांच्या विरोधात काही महिलांनी दिली असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्याची दहशत माजवून इतरांवर अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी दाखल केले आहेत, अशीही तक्रार महिलांनी भूमाता ब्रिगेडकडे दिली असल्याचं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.श्रीरामपूर येथे एका माजी मंत्र्यांच्या बंगल्यात दिनकर यांचे वास्तव्य असून तिथे अनेक गैरप्रकार चालतात असे महिलांनी सांगितल्याचा दावा देसाई यांनी केला आहे.

महिलांनी याबाबतचा जून महिन्यातील श्रीरामपूर जवळील ढाब्यामधील दारू पिऊन मित्रांबरोबर डान्स करताना तसेच पदासाठी बोलावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जबरदस्ती डान्स करायला लावत आहेत, असा एक व्हिडिओ सुद्धा आता समोर आला असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.


या व्हिडिओवर आणि तृप्ती देसाई यांच्या या तक्रारीवर नितीन दिनकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा व्हिडिओ 14 महिन्यापूर्वी माझ्या एका घरगुती कार्यक्रमाचा आहे. त्यावेळेस मी भाजपचा जिल्हाध्यक्ष सुद्धा नव्हतो. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा उपस्थित होते. तर त्या संदर्भातली एक पोस्ट मी माझ्या समाजमाध्यमावर 14 महिन्यापूर्वीच केलेली आहे. हे केवळ माझ्या बदनामीच षडयंत्र आहे,” असं दिनकर यांनी म्हटलं आहे. तर श्रीरामपूरमधील माजी मंत्र्याच्या बंगल्यावर गैरकारभार चालतात यावर सुद्धा नितीन दिनकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या बंगल्याच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तरीसुद्धा अशा प्रकारचे आरोप करताना त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत असं आव्हान नितीन दिनकर यांनी तृप्ती देसाई यांना दिलं आहे.

खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या तक्रारीवरुन तृप्ती देसाई यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोशल मीडियावर तृप्ती देसाई यांनी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडीओ बदनामी होईल अशा पध्दतीने सादर करुन, माझी व माझ्या पक्षाची, कुंटुब व अल्पवयीन मुलीची बदनामी होईल, अशा पध्दतीने प्रसिध्द केला. तसेच त्यासोबत खोटे आरोप करुन हेतूपुरस्सर माझी बदनामी केली आहे.

वास्तविक हा संपूर्ण व्हिडीओ न दाखवता त्याची एडिटींग करुन खोटे आरोप केलेले आहेत. सदर व्हिडीओ व्हायरल करुन माझी व माझ्या कुटुंबियांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितीन दिनकर यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles