अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम राबवत दोन दिवसांत 40 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत 32 आरोपींना अटक करण्यात आली असून 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सुमारे 12.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या या विधानानंतर गुटखा-पानमसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची तब्बल 25 वी बदली ठरली. पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच ठिकाणी धाड टाकून तब्बल 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी तसेच संशयित अन्नपदार्थांचा समावेश आहे. काही आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.ब्रँड आणि मोठमोठी आश्वासने देत, फायदे दाखवत कंपन्यांकडून अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते. चुकीच्या आणि मिसलिडिंग जाहिराती दाखवून ग्राहकांना उत्पादन घेण्यास भाग पाडले जाते. मात्र, आता मिसलीडिंग ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. यापुढे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, विशेष म्हणजे भ्रामक जाहिरातींमध्ये सहभागी सेलिब्रिटींवरही कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ग्राहक संरक्षणासाठी प्रशासनाची आक्रमक भूमिका असणार आहे. त्यामळे, तुकाराम मुंढे पुन्हा आपल्या विभागात सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या या कर्तव्याचे कौतुक होत आहे.


